1/28/2011

जाळ

गेल्या दोन आठवड्यांपासून जगामध्ये एक फार मोठा बदल व्हायला सुरूवात झालीय. बर्‍याच जणांना त्या बदलाचं महत्व कळत नसलं तरी त्याचे सुरू झालेले अन पुढे होतच राहणारे परिणाम प्रचंड दूरगामी असतील. हा बदल म्हणजे मध्यपूर्वेमध्ये (अर्थात पश्चिम आशिया अन उत्तर आफ्रिकेचा काही भाग) सुरू झालेली सरकारविरोधी आंदोलनं.
मध्यपूर्व हा जगाची तेलाची गरज पुरवण्यामध्ये फार महत्वाचा वाटा उचलणारा भाग आहे. आणि योगायोगाने हा भाग बहुतांशी अरब अन त्यातही मुस्लिमबहुल असा आहे. इस्लामची पताका इथूनच जगभर गेल्यामुळे अरबी मुस्लिम हे जरा जास्तच कट्टर आहेत. पण त्याच कारणामुळे इथल्या बहुतांश देशांमध्ये उत्तम शिक्षणाचं फारसं महत्व नाही. त्यातच ह्या भागामध्ये तेलाचे प्रचंड साठे असल्यानं औद्योगिकदृष्ट्या प्रगत अशा सर्व देशांचे इथे हितसंबंध असणं नेहमीच जरूरी होतं. ह्या धंद्यामध्ये अमेरिका नेहमीच आघाडीवर राहिलेली आहे, कारण वर्षांनुवर्षांपासून अमेरिकेची तेलाची भूक महाप्रचंड आहे. आणि त्याचबरोबर इस्रायल हे अमेरिकेच्या मांडीवरचं बाळही तिथेच शत्रूंच्या मधोमध राहत असल्यानं तिथे आपली माणसं असणं अमेरिकेसाठी अत्यावश्यक ठरतं. त्यामुळे अमेरिकेने ह्या देशांमध्ये अनेक हुकूमशहा पोसलेले आहेत. जे गेली कित्येक दशकं अशिक्षित अन गरीब जनतेला नाडत सिंहासनांवर बसून आहेत. कधी थेट हुकूमशहा म्हणून तर कधी खोट्या लोकशाहीचा मुखवटा घालून. एकंदर ह्या भागामध्ये गरिबी अन शिक्षणाचा अभाव फार असल्याकारणाने सत्तेवरची मांड लष्कराच्या मदतीनं टिकवणं सोपं जातं.
पण गेल्या काही वर्षांपासून इंटरनेटच्या प्रचंड वेगाने होत असलेल्या प्रसाराने लोकांच्या, विशेषतः तरूणांच्या आतल्या खदखदणार्‍या विचारांना वाट मिळाली. सोशल नेटवर्किंग साईट्सच्या माध्यमातून त्यांना व्यक्त होण्याची अन जगाच्या पाठीवरच्या समविचारी लोकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. इथल्या सरकारांनी कधी माहिती तंत्रज्ञानच काय कसलीच व्यवस्था नीट न ठेवल्यामुळे इंटरनेटचा विस्तारही अव्यवस्थितपणेच होत होता. पण हेच बंडखोर तरूणांच्या पथ्यावरही पडलं कारण त्यांना रोखण्यासाठीही फारसं काही केलं जाऊ शकत नव्हतं. इराण किंवा सौदी अन इतर काही देशांमध्ये बंडखोर तरूणाईच्या इंटरनेट स्वातंत्र्याचा गळा घोटण्याचाही प्रयत्न झाला, पण तरूणाई ह्या सगळ्याला पुरून उरली. जग छोटं झाल्यामुळे सगळ्या जगभरात चालणार्‍या गोष्टी, लोकशाही मूल्य अन पुरोगामी विचार ह्यांसारख्या गोष्टी ह्या भागातील लोकांनाही कळू लागल्या. आणि त्यातच गेल्या वर्षीपासून आलेल्या जागतिक मंदीमुळे मध्यपूर्वेतल्या छोट्या देशांची तर अवस्था बिकटच झाली. पण अर्थात जनतेची, शासकांची नाही. त्यामुळे लोकांमध्ये इतक्या काळापासून खदखदत असलेल्या असंतोषाचा स्फोट होण्याची चिन्ह होतीच. प्रथम इराणमध्ये झालेलं अयशस्वी अन निर्दयरित्या दडपलं गेलेलं सरकारविरोधी आंदोलन हे त्याचीच नांदी होतं.
आणि आता आठवड्याभरापूर्वी ट्युनिशियात घडलेली ते अभूतपूर्व आंदोलन. ट्युनिशिया, हा जागतिक नकाशावरचा एक ठिपका. पश्चिम आशियाला जवळ असणार्‍या उत्तर आफ्रिकेच्या किनार्‍याने वसलेला एक छोटासा देश. अक्षरशः इतका छोटा की आम्ही शाळेत नकाशा खेळताना (ह्या खेळात प्रतिस्पर्ध्याला नकाशावरचं एक ठिकाण शोधायला सांगायचं असतं) ट्युनिशिया हमखास सांगत असू. माझी अन ट्युनिशियाची पहिली ओळख ती अन दुसरी ही की त्यांची फुटबॉल टीम बरीच तगडी आहे. तर अशा ह्या नगण्या ट्युनिशियात गेली काही दशकं राज्यपदावर बसलेल्या राष्ट्रप्रमुखाविरूद्ध आंदोलन होतं आणि मोठ्या सातत्याने दडपशाहीविरूद्ध प्रक्षुब्ध जनता आणि तरूणाई आपल्या मागण्या लावून धरते आणि शेवटी त्या राष्ट्रप्रमुखाला देश सोडायला भाग पाडते, ही अभूतपूर्व घटना गेल्या आठवड्यात घडली.
अरब जगताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच जनतेनं 'यशस्वी' उठाव घडवून आणला. आणि एकजात सारे अरब नेते हडबडून गेले. कारण त्यातले जवळपास सगळेच कमीअधिक फरकाने हुकूमशहा. आणि माहिती तंत्रज्ञानाच्या अभूतपूर्व प्रगतीमुळे सार्‍या जगानं ही घटना पाहिली आणि ती सार्‍या जगापर्यंत व्यवस्थित पोचवायचं काम सोशल नेटवर्किंग साईट्सनीही केलं. ह्यामुळे आता मध्यपूर्वेच्या सगळ्या देशांमधल्या तरूणाईला एक आदर्श मिळालाय. एक असं उदाहरण जे आशादायी आहे. संपूर्ण व्यवस्थाच उलथून टाकणे हा मार्ग आचरण्यासाठी बरीच तरूणाई उत्सुक आहे. त्यामुळे लगेचच शेजारी अल्जेरियात उठाव सुरू झालेत. आणि आज इजिप्तमध्येही प्रचंड मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरू झालंय.
वर्षांनुवर्षं लोकांना गृहित धरून स्वतःची घरं भरणार्‍या राजकारण्यांना यःकश्चित प्रजाजन देशातून हुसकावून लावायच्या प्रयत्नात आहेत. एका ठिकाणी तर यशस्वीही झालेत आणि बाकी ठिकाणी लढाया सुरू झाल्यात. माझ्या मते तर ही खूप लांब चालणारी लढाई असेल. ह्या हुकूमशहांचे आलिशान प्रासाद जाळून आंदोलनकर्ते योग्य तो संदेश परिणामकारकपणे देताहेत. हा जाळ आता लवकरच पसरेल आणि जर हुकूमशहा जाऊन तिथे योग्य तशी लोकशाही येऊ शकली तरच खरा विजय ठरेल पण अमेरिकेसह तमाम स्वार्थी युरोपियन देशांचे वांधे होतील. अन्यथा अराजकच माजेल आणि त्यात जनतेची परवड अन अजून एखाद्या हुकूमशहाचा उदय एव्हढंच निष्पन्न होईल. पण दोन्हीही परिस्थितींमध्ये जगामध्ये अन जगाच्या राजकारणामध्ये मोठ्या उलथापालथीचे संकेत आहेत. ही उलथापालथ अगदी रातोरात नाही झाली तरी हळूहळू पण निश्चितपणे होईल आणि कायमस्वरूपी परिणाम करेल.
पण हा जाळ भारतात कधी येईलसं वाटत नाही. आपले लोक फारच निर्ढावलेत. इतके घोटाळे रोजच्या रोज बाहेर येऊनही फक्त घराणं, नातेवाईक हे बघूनच आपले लोक वर्षांनुवर्षं मतदान करताहेत. सरकारला जाब विचारणं दूरच साधा विरोध प्रदर्शित करणंही आपल्या लोकांच्यानं होत नाही. रोज एकेका जीवनावश्यक वस्तूचे भाव वाढत चाललेत पण आपल्याला पुतळे, इतिहास, जात ह्या गोष्टींमध्ये प्रचंड स्वारस्य आहे. आणि अन्यायविरोधी आंदोलनांसाठी नाही तर जातीपाती अन धर्मांवरून दंगलींसाठी जाळपोळ करायला अन रक्त सांडायला आपले लोक तयार आहेत.
आपल्या माणसांना कधीतरी हे समजेल का की मेणबत्त्या आणि संग्रहालयं पेटवून काही होत नाही. आयुष्याच्या मशाली पेटवायला लागतात आणि त्यांतूनच जो जाळ निर्माण होतो तो जगातल्या मोठ्यांतल्या मोठ्या पापाच्या पैशांच्या प्रासादांना स्वाहा करायची ताकद ठेवतो.

30 comments:

  1. छान लिहिलयस. कालची ईजिप्त ची बातमी पण कळली असेलच ना?

    ReplyDelete
  2. मस्त लिहिलंयस..

    >> आपल्या माणसांना कधीतरी हे समजेल का की मेणबत्त्या आणि संग्रहालयं पेटवून काही होत नाही. आयुष्याच्या मशाली पेटवायला लागतात आणि त्यांतूनच जो जाळ निर्माण होतो तो जगातल्या मोठ्यांतल्या मोठ्या पापाच्या पैशांच्या प्रासादांना स्वाहा करायची ताकद ठेवतो.

    अप्रतिम !

    ReplyDelete
  3. बाबा..मागच्या आठवड्यात इथे बातम्यात ट्युनिशियाबद्द्ल पाहिलं होतं...तू हा लेख इतका समर्पक लिहिलास की काही "आदर्श" व्यक्तींनी कानफ़डात मारल्यागत गप बसावं..
    शेवटचा परिच्छेद आपल्याइथे जागोजागी असणार्‍या बिनकामी होर्डिंगाऐवजी तिथे मोठ्या टायपात लावलं पाहिजे....

    ReplyDelete
  4. एकदम आतून आलेले लिखाण झालेय. अप्रतिम!

    पाच सहा दिवसांपूर्वीच ट्युनिशिया आंदोलनाची बातमी वाचली पाहिली होती. मग गुगललेही. क्रांती अशीच सुरू होत असते. जी आपल्याकडे इंग्रजांविरूध्द लढताना घडली. नंतर मात्र फक्त बट्ट्याबोळच. :(

    ReplyDelete
  5. आपल्या इथे अस्बेस्टॉस आहे लोकांच्या कातडीऐवजी, आग लागायला तापमान फार जास्त वाढावं लागेल आणि टूजी, cwg सारख्या अनेक आहुती पडायला लागतील. पण हा जाळ पसरेल अशी आशा करूयात.

    (मला कधीकधी वाटतं की आपल्याकडे राजकारण्यांनी एक नाजूक समतोल साधला आहे. भ्रष्टाचार करायचा, गळ्यापर्यंत पाणी आणायचं पण पुढे जायचं नाही, श्वास घ्यायला जागा ठेवायची आणि आम्ही तुम्हाला कसं वाचवतोय हे सांगायचं. या आफ्रिकन देशांमध्ये हुकूमशाही असल्याने तिथे तो समतोल साधला गेला नसावा. छे! इथल्या राजकारण्यांनी तिकडे कार्यशाळा घेतल्या नसाव्यात.)

    ReplyDelete
  6. विभि...मस्त लिहल आहेस....

    शेवट एकदम पटेश....

    ReplyDelete
  7. गिरीश कुबेर यांची तेलावरची तीनही पुस्तकं या तेलाच्या राजकारणाचा आणि धर्मांधतेचा संबंध व्यवस्थित दाखवून देतात. त्याच्या जोडीला प्रतिभा रानडे यांची पाकीस्तान, अफगाणीस्तान वरची पुस्तकं वाचली तर या सगळ्याचं वर्तुळ पूर्ण होतं आणि सगळं स्वच्छ दिसायला लागतं. वाट आहे ती फक्त कॉंग्रेस विषयीच्या एका पुस्तकाची.......म्हणजे भारतातील स्वातंत्र्योत्तर काळातील कॉंग्रेसच्या एकूण राजकीय कारकिर्दीची.......म्हणजे सगळंच आरशा सारखं स्वच्छ होईल. मग जाळ तयार होऊन झेपावायला वेळ लागणार नाही.

    ReplyDelete
  8. http://www.thehindu.com/opinion/op-ed/article1097774.ece
    मध्ये ही लिंक बझवर टाकली होती. वाचली होतीस का?
    आपल्याला एक वाईट खोड आहे कि कोणीतरी दुसऱ्याने काहीतरी करावे...म्हणजेच शिवाजी शेजाऱ्याकडे जन्मास यावा.
    प्रत्येकजण ज्यावेळी जबाबदारीने वागायला शिकेल...देशाच्या वर्तमानकाळात व भविष्यकाळात प्रत्येकाचे योगदान आहे, हे समजून घेईल त्यावेळीच काही बदल घडेल...एक ठिणगी आणि आयुष्याची मशाल.
    बघू, आपल्यासाठी कोण कधी आयुष्याची मशाल पेटवतो ते!
    (हे मी तुला बोलत नाहीये...स्वत:बद्दलही माझे हेच म्हणणे आहे)

    ReplyDelete
  9. आदित्य,
    कळली होती रे बातमी. एक ओळ त्याबद्दलही लिहिलेली. इस्रायलशी शांतता करार करण्यासाठी होस्नी मुबारकला मजबूत पैसे मिळाले होते अमेरिकेकडून हे उघड गुपित आहे!

    ReplyDelete
  10. हेरंबा,
    जीव तुटतो फार! आपल्याच्यानंही काही होत नाही म्हणून! :(

    ReplyDelete
  11. अपर्णा,
    वाईट ह्याचंच वाटतं की ज्यांना खरंच फरक पडायला पाहिजे त्यांना कशाचंच काही वाटेनासं झालेलं आहे! :(

    ReplyDelete
  12. ओंकार,
    खरं आहे. आपले लोक ऍस्बेस्टॉसचेच बनलेले आहेत. असं म्हणतात की आग घरापर्यंत आल्यावर तरी माणसं विहिर खोदतात. पण आपल्याकडे घरात आग लागली की लोक देव पाण्यात बुडवून बसतात! :(
    आणि राजकारणी तर भारीच..तिकडे कलमाडीला सीबीआय चौकशीसाठी बोलावलेलं त्याच दिवशी रात्री दादोजींचा पुतळा महापालिकेनं हलवला... इतकं सोपं आहे सगळं.. लोक कांद्याचे वाढलेले भावही विसरून गेले.

    ReplyDelete
  13. श्रीताई,
    अगं खरंच अगदी वाईट वाटतं की साधा विरोधही प्रदर्शित करावासा वाटू नये इतके आपण भेदरलेलो आहोत की हतबल आहोत की संवेदनाहीन आहोत! अचानक देशभक्तांचा एव्हढा तुटवडा व्हावा देशात? की देशभक्ती जागवायला पुन्हा परकीय आक्रमणाची वाट पाहायची?

    ReplyDelete
  14. योगेश,
    अरे जाम जीव जळतोय रे गेल्या आठवड्यापासून. अरब जगत, जिथे एव्हढी दडपशाही चालते, तिथे लोक पेटून उठले आणि सरकारं हादरलीत. आणि आपल्याकडे जिथून जगभराला टॅलेंटचा सप्लाय होतो, तिथे मनमानी कारभार चालतोय अगदी वर्षांनुवर्षं बिनबोभाट! :(

    ReplyDelete
  15. अलताई,
    तू सांगितलेली पुस्तकं मी वाचलेली नाहीयेत अजून. नक्की शोधतो अन वाचतो. खरंच ज्यादिवशी आपल्याकडच्या लोकांना आत्मभान येईल ना, त्यादिवशी आपोआप क्रांती घडेल!

    ReplyDelete
  16. अनघाताई,
    >>शिवाजी शेजाऱ्याकडे जन्मास यावा.
    हे अगदी योग्य वर्णन आहे आपल्या मानसिकतेचं आणि ती मानसिकता आपल्या सर्वांचीच आहे हे ही मी मान्यच करतो. हे चित्र बदलण्यासाठी आपल्यापासून सुरूवात करणं भाग आहे आणि माझा प्रयत्न चालूच राहिल! कायम! भले त्यातनं काही निष्पन्न न होवो..पण मी प्रयत्न केला नाही, मी माझा वाटा उचलला नाही असं नको..

    ReplyDelete
  17. सोनावण्यांनी केली त्यांच्या आयुष्याची मशाल...परंतु ही आग अधिक बळी मागणारी आहे....

    ReplyDelete
  18. बाबा अप्रतिम! पटलंय अगदी पटलंय.गोची होते आपली आणि आपण आपल्या पद्धतीने त्यासाठी केलंच पाहिजे!

    ReplyDelete
  19. अगदी योग्य वर्णन ..मस्त लिहल आहेस....

    ReplyDelete
  20. वर नको तिथे शूरपणा दाखवायला कोणी सांगितलं होतं हेही ऐकायला मिळेलच... :( मरणारा मरून जातो, जगणारे खाली मुंडी घालून खुरडत राहतात... अपराध नेमका जिथून सुरू होतो ते अल्लाद सुखासिनतेत रममाण असतात...

    ReplyDelete
  21. अनघाताई,
    खरं आहे...क्रांती बरेचदा रक्त मागते... :(

    ReplyDelete
  22. विनायकजी,
    धन्यवाद! आपण आपला वाटा उचलायचा किमान प्रयत्न तरी केलाच पाहिजे! :-|

    ReplyDelete
  23. गौरव,
    धन्यवाद भाऊ! मनात खदखदत होतं सगळं! :)

    ReplyDelete
  24. श्रीताई,
    >>नको तिथे शूरपणा दाखवायला कोणी सांगितलं होतं
    हे फार टोचतं मला...
    अन तू जे लिहिलंयस ते अतिशय कटू सत्य आहे! :(

    ReplyDelete
  25. रक्तहीन क्रांतीसुद्धा होऊ शकते. गरज आहे ती प्रत्येकाने बदलण्याचा प्रण करायची. आपण म्हणजे देश रे, आपण बदलू तर देश बदलेल. थोडे जागरूक झालो ना की बराचसा भष्टाचार कमी होईल.आणि संघटीत आवाज उचलण्याची गरज आहे. एक ओरडतो बाकीचे तमाशा बघतात. तुला माहित असेलच इकडे आपण क्रांतीची भाषा केली की लगेच नक्षलसमर्थक म्हणून तुरुंगात डांबले जाते. राजकारण भयंकर खालावालेय रे बाबा. इथे जोशात भाषण करणाऱ्या विद्यार्थ्यांनादेखील नक्षलसमर्थक दाखवले जाते, आणि बी -ग्रेड वाले मोकाट सोडले जातात. मग मी चित्रेंची आठवण काढतो. (आयला १४ भांडारकर भटांच्या यादीत यांचे देखील नाव टाकले आहे ना??) >>
    " देवा याही देशात पाउस पाड..
    जिथे पाण्याला येतो खुनाचा वास.."

    ReplyDelete
  26. Anonymous5:06 AM

    निश्चितच ही लोकशाही साठी वेग घेणारी क्रांती आहे अस दिसतय.
    पण ही लोकशाही भारतासारखी होऊ नये.
    भारतही म्हणायला स्वतन्त्र आणि लोकशाही आचरणारे राष्ट्र आहे
    पण आजही आपण मूठभर राज्यकर्त्यांच्या तालावर नाचवली जाणारी बहुलीच आहोत.
    लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी केलेले राज्य असे नागरिक शास्त्रात वाचले होते
    पण इथे राज्यकर्ते फक्त स्वत:साठीच राज्य करतात.
    त्यामुळे मध्य पूर्वेमधल्या क्रांतीला यश येवो पण तेथील जनतेच्या हिताचेच बदल घडावेत..
    >>पण हा जाळ भारतात कधी येईलसं वाटत नाही. आपले लोक फारच निर्ढावलेत.
    हे पटले.

    ReplyDelete
  27. संकेत,
    राजकारण भयंकर खालावलंय हे सत्यच आहे! तत्कारणातच मला आपल्याकडे रक्तहीन क्रांती होणं अवघड दिसतं. पण काहीही घडू शकतंच..
    त्यामुळे कीप द फिंगर्स क्रॉस्ड!! :)
    >>" देवा याही देशात पाउस पाड..
    जिथे पाण्याला येतो खुनाचा वास.."
    +१

    ReplyDelete
  28. तृप्ती,
    >>भारतही म्हणायला स्वतन्त्र आणि लोकशाही आचरणारे राष्ट्र आहे
    पण आजही आपण मूठभर राज्यकर्त्यांच्या तालावर नाचवली जाणारी बहुलीच आहोत.
    अगदी खरं आहे...आपल्याकडे खर्‍या अर्थाने लोकशाही रूजलीच नाही अजून! सदिच्छा करणं एव्हढं तरी आपल्या हाती निश्चितच आहे! :)
    धन्यवाद!

    ReplyDelete