1/23/2011

कडू गुपित

एखादा चित्रपट महोत्सव झाला आणि त्याबद्दल पेपरात वाचलं की मग मी मनाशी एक कुठलीही भाषा धरतो आणि त्या भाषेतल्या सिनेमांबद्दल नेटवर माहिती शोधतो. मग त्यातून अनेकदा हाताला रत्नं लागतात. वेगवेगळ्या देशांतल्या वेगवेगळ्या संस्कृतींची निदान एक तोंडओळख होते. आणि माणूस ह्या प्राण्याची सुखदुःख वरकरणी कितीही वेगवेगळी वाटली तरी एका समान वैश्विक धाग्यानं एकमेकांत गुंफली गेल्याचं सत्य वारंवार मनात गडद होत जातं. सापडलेला/ले सिनेमे मिळवून बघणं म्हणजे खरी गंमत. तो मिळून पाहेस्तोवर त्याबद्दल जास्त वाचणं टाळायचं वगैरे, एकदम माहौल बनवायचा. पण सिनेमा सहज मिळणारा नसला तर मग अजून मजा. जंग जंग पछाडून, नेटाने नेटावर शोधून तो सिनेमा मिळवणं आणि मग तो बघणं, ह्यात मेहनतीचं चीज झाल्याचं समाधान आणि चांगला सिनेमा अनुभवल्याचा आनंद असा दुहेरी फायदा होतो.
ह्या सगळ्या उपक्रमांतून आजवर खूप सिनेमे अनुभवलेत, ह्यापुढेही अनुभवेन. अगदी कोरियन, जपानीपासून ते पॅलेस्टिनियन, तुर्की आणि फिनलँड, स्वीडन पासून ते नॉर्वेजियन पर्यंत अनेकानेक सिनेमांचा आनंद केवळ इंटरनेटच्या कृपेमुळे घ्यायला मिळाला. २००२ सालच्या ख्रिस्तोफर नोलान दिग्दर्शित, अल पचिनो अभिनित इन्सॉम्निया चा ओरिजिनल सिनेमा म्हणजे १९९७ सालचा नॉर्वेजियन इन्सॉम्निया मिळवण्यासाठी मी तब्बल दोन आठवडे तडफडलो होतो. पण मिळाल्यानंतर पाहताना जे समाधान लाभलं, त्याला तोड नाही. ह्या चित्रविचित्र भाषांचे सिनेमे सबटायटल्ससकट पाहिल्याचा एक दुष्परिणाम असा झाला आहे की मी अगदी मराठी सिनेमा पाहत असलो तरी खाली सबटायटल्स आली तर नजर तिथेच जाते.
आणि असाच एक दिवस मी मनाशी धरला सर्बिया आणि सिनेमा शोधता शोधता हाताशी लागला बोस्नियन सिनेमा - गर्बावित्सा (Grbavica). उच्चार नक्की असाच नसला तरी जवळपास जाणारा आहे. बोस्नियन राजधानी सारायेव्हो (Sarajevo) चं एक छोटं उपनगर 'गर्बावित्सा' मध्ये घडणारी एक छोटीशीच, पण उद्विग्न करणारी कहाणी म्हणजे हा सिनेमा.
पुढे सिनेमाच्या कथेतलं छोटंसं रहस्यदेखील सांगण्यात आलेलं आहे ह्याची मी आधीच कल्पना देऊन ठेवतो.
ही गोष्ट घडते ती युद्धोत्तर बोस्नियामध्ये. १९९२ सालच्या जवळपास बोस्नियाक आणि सर्ब लोकांमध्ये घडलेल्या युद्धाची सुन्न करणारी अदृश्य पार्श्वभूमी ह्या सिनेमात आहे. सिंगल मदर एस्मा जमेल ते आणि पडेल ते काम करून आपल्या १२ वर्षांच्या मुलीला साराला वाढवतेय. अधुनमधुन ती सपोर्ट ग्रुप्समध्येही जाते. परिस्थितीनं गांजलेली, थकलेली आणि हतबल अशी वाटणारी एस्मा सारासाठी मात्र आपली सगळी ताकद एकवटून उभी आहे. १२ वर्षांची सारा कुठल्याही नॉर्मल १२ वर्षीय मुलीसारखी उत्स्फूर्त, खेळकर आणि मोकळं आयुष्य जगतेय. एस्मा तिला गरजेचं असं काही कमी पडू देत नाही. आणि मग एक दिवस साराच्या शाळेची ट्रीप निघण्याची सूचना येते.
ट्रीपची फी भरा किंवा ज्या मुलांचे वडील बोस्नियाक-सर्ब युद्धात (सिनेमामध्ये जाणून बुजून 'सर्ब' शब्दाऐवजी 'चेटनिक' हा स्लँग शब्द वापरलाय) शहीद झालेत अशांना सर्टिफिकेट दाखवून फुकट ट्रीप, अशी सूचना शाळा काढते. साराला लहानपणापासून आईनं हेच सांगितलंय की तुझे वडील चेटनिक्स शी लढताना शहीद झालेत. त्यामुळे शाळेतही मिरवून आणि मित्र समीरला सांगून की तुझ्या वडलांप्रमाणेच माझे वडीलही शहीद झाले होते, सारा घरी येते आणि आईकडे वडलांच्या हौतात्म्याचं सर्टिफिकेट मागते. एस्माचं छोटंसं जग हादरतं. पूर्वीपासूनच वडलांच्या ओळखीबद्दल सारवासारव करणारी एस्मा आता मात्र भांबावून जाते आणि तिचं ते भांबावून जाणं साराच्याही नजरेतून सुटत नाही.
एस्माकडे सर्टिफिकेट तर नाहीये ती साराला सांगते की ती सर्टिफिकेट मिळवायचा प्रयत्न करेल आणि प्रत्यक्षात ती ट्रीपचा खर्च उचलण्याची तयारी सुरू करते. सगळ्या ओळखीच्यांकडून उधार मिळवण्याचेही प्रयत्न अपुरे ठरतात. ती एका नाईटक्लबमध्ये वेट्रेसचं कामही सुरू करते. इकडे सारा सर्टिफिकेटसाठी जसजशी मागे लागत राहते, माय-लेकींमधला तणाव वाढत जातो. आणि जेव्हा शाळेत हुतात्म्यांच्या मुलांची यादी लागते, तेव्हा त्यात स्वतःचं नाव न पाहून सारा हादरते. एका वर्गमित्राच्या खोचक टोमण्यावर कुणा दुसर्‍याच्या तोंडून ऐकलेली बापाच्या हौतात्म्याची कहाणी स्वतःच्या बापाची म्हणून सांगते. घरी येऊन ती आईला खूप टोचते तेव्हा शेवटी एस्मा पूर्ण कोलमडून जाते आणि साराच्या वडलांबाबतचं कडू गुपित ती सांगते.
बोस्नियाक-सर्ब युद्धांमध्ये चेटनिक्स अर्थात सर्ब सैनिकांनी बोस्नियन स्त्रियांचे 'मास रेप' केले होते. ही एका पद्धतीची अमानवी युद्धनीती आहे, ज्यात स्त्रियांवर अनन्वित अत्याचार करून पूर्ण समाजाचा पायाच हालवून टाकला जातो. नुकताच आफ्रिकेतील वांशिक युद्धांमध्येदेखील ह्या पाशवी नीतीचा वापर केल्याचं बातम्यांमध्ये ऐकलं होतं. तर एस्मा ह्याच पाशवी प्रकाराचा एक बळी असते. आणि ह्याचाच अर्थ सारा ही एका हुतात्म्याची नाही, तर एका चेटनिकची म्हणजे शत्रूची मुलगी असते.
हे कडू गुपित ऐकल्यावर साहजिकच सारा सुन्न होते आणि आपल्या खोलीत जाऊन बसते. दुसर्‍या दिवशी एस्मा साराला घेऊन ट्रीपच्या बसपर्यंत सोडायला जाते. सारा अजूनही बोलत नाहीये. पण बस जशी पुढे जायला लागते, तशी मागच्या खिडकीतून सारा आपल्या हतबल आईकडे पाहत राहते. आणि अगदी शेवटी ती तिला हात करते. आणि मग बसमध्ये गाणार्‍या इतर मुलांसमवेत आवाजात आवाज मिसळून गायला सुरुवात करते.
हा सिनेमा माय-लेकींचं तरल नातं तितक्याच हळुवारपणे रेखाटत जातो. एस्माची व्यक्तिरेखा कधी हतबल तर कधी निग्रही तर कधी कमालीची कोसळलेली इतक्या टोकांपर्यंत हेलकावे खाते आणि अभिनेत्री मिरयाना करानोविचनं ती तितक्याच तपशिलासकट उभी केलीय. सारा (लुना मिओविच) सकट सर्वच प्रमुख पात्रांचं काम पूरक आहे. मुलीसाठी आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीची आहुती देणारी आई वैश्विक आहे हेच हा सिनेमा पुन्हा अधोरेखित करतो.
सिनेमा बर्‍यापैकी संथ आहे. काही काही ठिकाणी, एस्पेशली सपोर्ट ग्रुप्सच्या सीन्समध्ये तर सिनेमा चक्क थांबल्यागत वाटतो. पण तीच ह्या सिनेमाची प्रकृती आहे. एखादं विकल करणारं संथसं शोकगीत असावं, तद्वत हा सिनेमा आपलं अंतःकरण विदीर्ण करत जातो. एस्माच्या गुपिताची आपल्याला तिनं सांगायच्या आधीच थोडी कल्पना येते. पण रहस्य हे सिनेमाचं सार नसल्याने, फारसा फरक पडत नाही. आपले वडील कोण, ह्याची जाणीव झाल्यानंतर सारा जेव्हा स्वतःच्या खोलीत जाते. आणि पूर्वी एकदा सारानं आईला विचारलेलं असतं की माझे केस तुझ्यासारखे नाहीत, म्हणजे माझ्या वडलांसारखे असणार, तो प्रसंग आठवून सारा स्वतःच्या केसांकडे पाहते आणि हेअर ट्रीमरनं आपले सगळे केस काढून टाकते. हा प्रसंग अक्षरशः अंगावर काटा आणतो.हा, तसेच साराचं आपल्या वर्गमित्रावर रागावणं किंवा एस्माचे काही प्रसंग सिनेमाला वेगळ्याच उंचीवर घेऊन जातात.
सिनेमाला आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळालेली आहेच. बर्लिन फिल्म फेस्टिव्हलचा प्रतिष्ठेचा गोल्डन बेअर पासून अनेक सन्मान मिळालेत. पण दिग्दर्शिकेचा हा सिनेमा हृदयाची जी तार छेडून जातो, त्यावरचा कुठलाही पुरस्कार अस्तित्वातच नाही.
(पोस्टरचं छायाचित्र विकिपीडियावरून साभार. बोस्नियाक-सर्ब युद्धाबद्दल अधिक माहिती इथे.)

हा लेख शब्दगाSSरवा ह्या जालरंग प्रकाशनाच्या २०१० च्या हिवाळी अंकातील पूर्वप्रकाशित लेख आहे. मूळ लेख इथे वाचता येईल.

16 comments:

  1. वैश्विक सत्य आहे खरं.
    आभार ह्या सिनेमाबद्दल लिहिल्याबद्दल. बघेन लवकरात लवकर. तू लिखाणातही तेव्हढीच तरलता ठेवली आहे....सिनेमा इतकीच.

    ReplyDelete
  2. शब्दगाSSरवा मध्ये लेख वाचून झाल्यावर लगेच बोस्नियाक-सर्ब युद्धाबद्दल आणि त्यावर आलेल्या चित्रपटांवर विकी करून बघितलं. अनेक चित्रपट आहेत रे.. लेख वाचून झाल्यावर तेव्हाच हा चित्रपट बघायचा ठरवलं होतं. आता लवकरात लवकर बघेन.

    इथे माझा एक कलिग आहे. १०-१२ वर्षांपूर्वी बॉस्निया सोडून इथे आला. त्याच्या तोंडून बॉस्निया वॉरबद्दल कधी कधी ऐकायला मिळतं. (पण विशेष तपशीलात नाही.) पण त्यामागे एवढा भयंकर इतिहास असेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं ! :(

    ReplyDelete
  3. आता हा सिनेमा लवकरच पहायला हवा. तुझे परिक्षण खूपच भावले.

    बाकी, कुठेही बायकांच्या वाट्याचे भोग चुकलेले नाहितच.:( मग ते देशांदेशांतले युध्द असो वा जमिनीचा वाद.

    ReplyDelete
  4. असे विषय म्हणजे लाखो लोकांचे जीवन असत हे सत्य जाणवून हतबल वाटत!

    ReplyDelete
  5. मस्तच ! टोरेंट चे लिन्क शेअर कर असेल तर!
    एस्मा जेव्हा तिला बसमध्ये सोडायला जाते त्याप्रसंगावरुन द पेट्रीयट मधला एक सीन आठवला.
    मेल गिब्सन आणि लेजर जेव्हा त्याच्या कुटुंबाचा निरोप घेउन युध्द्दावर जात असतात तेव्हा ती छोटी मुलगी जी गिब्सनशी कधी बोलत नसते, जेव्हा बिब्सन जायला निघतो तेव्हा ती त्याचामागे धावत जाते आणि गिब्सन तिला कवटाळतो तो सीन मला खुपच भावतो. इअथे शब्दांत नीट मांडता नाही येत. बघितल्यावरच त्यातली बाप-लेकीमधली आर्तता जणवते. !

    ReplyDelete
  6. अनघाताई,
    बघ नक्की... अगदी वेगळाच सिनेमा आहे.. :)

    ReplyDelete
  7. हेरंब,
    मी ह्या युद्धावर काही डॉक्युमेंट्रीज पाहिल्या बीबीसी वगैरेंवर अन मग बराच रिसर्च केलेला हा सिनेमा पाहिल्यावरही. फार विचित्र अन विषण्ण करणार्‍या गोष्टी घडलेल्या आहेत... :(
    पहा हा सिनेमा..अगदी आवर्जून..

    ReplyDelete
  8. श्रीताई,
    >>कुठेही बायकांच्या वाट्याचे भोग चुकलेले नाहितच.
    खरंच सुन्न करणारं सत्य आहे हे
    बघ नक्की सिनेमा...

    ReplyDelete
  9. सविताताई,
    खरंच.. खूप हतबलता येते.. :(

    ReplyDelete
  10. दीपक,
    अरे मी पेट्रियट पाहिला नाहीये..पण बघायचाच आहे...आता तू हा सीन सांगितलायस, त्यामुळे उत्सुकता वाढलीय अजून...
    टॉरेंटची लिंक मुंबईच्या पीसीवर आहे रे...शोधायचा प्रयत्न करतो, गुगलावर... :)

    ReplyDelete
  11. Anonymous2:41 AM

    बाबा अगदी श्रीताई म्हणतेय तसेच... बायकांच्या वाट्याचे भोग बदलत नाहीत....

    तू लिहीलयेस अगदी मनापासून, नेहेमीचेच वाक्य टाकावे लागेल मला आता, की तू सुचवलायेस म्हणून आता नक्की पहाणार हा सिनेमा. बाकि कधी ते राम जाणे, कितीतरी हिंदी-मराठी सिनीमे घरी असूनही मी गेल्या बऱ्याच दिवसात एकही पाहिलेला नाही :(

    ReplyDelete
  12. खूप छान असणार चित्रपट आणि त्याचं रसग्रहणही तुम्ही खरंच अगदी तरल केलं आहे.बघायलाच हवा!

    ReplyDelete
  13. तन्वीताई,
    बघ नक्की जमेल तेव्हा..नाहीतर जूनमध्ये येशील तेव्हा देतो तुला सगळे सिनेमे :)

    ReplyDelete
  14. विनायकजी,
    खरंच उत्तम चित्रपट आहे.. नक्की पाहा मिळाला तर..
    धन्यवाद!

    ReplyDelete
  15. Anonymous9:50 PM

    >>>नाहीतर जूनमध्ये येशील तेव्हा देतो तुला सगळे सिनेमे....

    हेच मी पण म्हणणार होते पण तू म्हणशील अशी खात्री होती... :)

    ReplyDelete
  16. तन्वीताई,
    :D

    ReplyDelete