1/30/2011

झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिये

लहानपणी हे कुठल्याशा गाण्यात ऐकलं होतं. पण त्याचा अर्थ तेव्हा फारसा समजला नव्हता. पण मग एक एक उदाहरणं पाहत पाहत हळू हळू अर्थ थोडाफार समजला. पण आज तर असलं भारी उदाहरण पाहायला मिळालं की हे वाक्य केवळ ह्याच घटनेसाठी लिहिलं गेलं असावं असं वाटलं. आत्ताच 'बीबीसी' वर एक बातमी पाहिली. त्याचं झालं असं -
साल २००९ इराकच्या बगदादमध्ये साखळी स्फोट घडतात आणि शेकडो माणसं मरतात. चर्चा अशी सुरू होते, की इतकी सारी स्फोटकं राजरोसपणे बगदादसारख्या प्रचंड सुरक्षाव्यवस्था असलेल्या भागामध्ये आलीच कुठून? मग पोलिसांच्या आणि सुरक्षादलांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह लागू लागतात. चौकशी आणि तपास सुरू होतो आणि सगळ्यांचं लक्ष एका छोट्याशा गोष्टीकडे जातं. आणि अनेक मोठी माणसं कपाळाला हात मारतात.
९०चं दशक. अमेरिकन नेव्हीकडे काही उद्योजक जातात आणि म्हणतात, 'आमच्याजवळ सर्व प्रकारची स्फोटकं शोधून काढणारं एक यंत्र आहे.' एक छोटंसं खेळण्यातल्या बंदुकीसारखं दिसणारं यंत्र, ज्याच्यापुढे एक छोटीशी एरियल लावलेली आहे. ती बंदूक धरायची आणि एरियल पूर्ण उघडून चालायचं. एरियल स्फोटकं जिथे असतील त्या दिशेने फिरते. इतकं सोपं आणि सुटसुटीत यंत्र. ते ही प्लॅस्टिकचं. अमेरिकन नेव्ही त्याची परीक्षा घेते आणि ते यंत्र परीक्षेमध्ये फेल होतं. एफबीआय हे यंत्र अमेरिकेत मार्केट होऊ नये असं फर्मान काढतं.
२००० साली इंग्लंडमध्ये असेच काही उद्योजक ब्रिटीश आर्मीकडे जातात आणि चक्क एका मेंबर ऑफ पार्लमेंटच्या शिफारसीवर ह्या यंत्राची चाचणी ठरते. प्राथमिक चाचणी फेल होते. पण तरीसुद्धा चाचणी घेणारे प्रशिक्षित नाहीत असं कारण सांगून पुढची चाचणी पुढे ढकलली जाते.
पण ९० च्या दशकापेक्षा आता जागतिक परिस्थिती बदललेली असते. जग फारच मोठ्या प्रमाणावर साशंक आणि अस्थिर झालंय. नेमक्या ह्याच गोष्टीचा फायदा हे उद्योजक उचलतात. आणि माल्टामध्ये एअरपोर्ट सिक्युरिटी आणि पोलिसांकडे ह्या यंत्राचा प्रस्ताव जातो. शिफारस करणारे काहीजण ब्रिटीश आर्मी आणि पार्लमेंटशी निगडीत असतात. काही चाचण्या फसतात पण तरीही थोड्याप्रमाणात संशयास्पद विक्री होतेच.
नंतर ह्या यंत्राचे प्रस्ताव जगभरच्या अनेक अस्थिर देशांकडे जातात आणि शिफारसी पाहता आणि देशोदेशीच्या सरकारांमध्ये असलेले भ्रष्टाचार पाहता ह्या यंत्रांची प्रचंड प्रमाणावर विक्री होते. त्या देशांच्या यादीत पाकिस्तान, इराक, अफगाणिस्तान वगैरे देशांचीही नावं आहेत. नशीबानं त्यात भारताचं नाव दिसलं नाही.
पण २००९ मध्ये इराकमध्ये हेच यंत्र सापडल्यावर लोकांच्या भुवया उंचावल्या. इराक सरकारनं काही मिलियन खर्च करून ही यंत्र सुरक्षाव्यवस्थेसाठी विकत घेतली होती आणि त्याचाच परिणाम म्हणजे स्फोटकं बिनासमस्या शहरामध्ये प्रवेश करती झाली. शेकडो लोकांचे जीव गेले. चौकशी समिती बसली. बीबीसीनं सुद्धा स्फोटकांच्या तज्ज्ञांबरोबर तपास केला आणि लक्षात आलं की ही यंत्र केवळ खेळणी आहेत. त्यामध्ये स्फोटकं शोधू शकेल असं काहीच नाही. आणि जगभर ही एकसारखीच यंत्र वेगवेगळ्या नावांनी कधी स्फोटकं शोधणारी, कधी ड्रग्ज शोधणारी तर कधी हस्तिदंत शोधणारी म्हणून विकली गेली. आणि सगळ्यांत गंमतीची गोष्ट ही, की असलं एक यंत्र बनवायला जास्तीत जास्त १० ब्रिटीश पौंड एव्हढा खर्च येतो, पण एक एक यंत्र १५००० पौंडांपर्यंत विकलं जातं. माल्टा एअरपोर्टचा सिक्युरिटी हेड आजही टेलिव्हिजनवर सांगतो की हे यंत्र 'फ्रॉड' आहे आणि ते काहीही शोधू शकत नाही. तो त्या यंत्राची खोटी हालचाल कशी होते ह्याचं प्रात्यक्षिकही करून दाखवतो.
असं म्हणतात की ह्या यंत्राची शिफारस करणार्‍या ब्रिटीश मेंबर ऑफ पार्लमेंटला एका यंत्रामागे ३००० पौंड मिळणार होते. त्यानं एका काऊंटर टेरर एक्स्पो मध्ये तर खुलेआम त्या यंत्राची वकिली केली होती. तो अजूनही इंटरव्ह्यू मध्ये गोल गोल बोलतो. पण अजूनही तो हे मान्य करत नाही की तो कित्येक जीवांशी खेळलाय.
सगळ्यांत गंमतीशीर गोष्ट ही की ब्रिटीश सरकारनं ह्या यंत्राच्या 'अफगाणिस्तान आणि इराकच्या निर्यातीवर बंदी' घातलीय. कारण, ब्रिटीश आणि मित्र राष्ट्रांच्या सैनिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. बाकी जगभर माणसं मेली तरी चालतील!
झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिये! हेच खरं.

टीप - ह्या यंत्रांबद्दलची अधिक माहिती इथे पहा.

15 comments:

  1. लई भारी !!!!
    :(

    ReplyDelete
  2. भारतात मायलो नावाचा भिक्कार गहू आणि सोबतीला गा्जरगवत पाठवणारी च्यामारिकाच होती ना !!!!

    आणि तिसर्‍या जगातल्या देशांची संरक्षणविषयक व्यवहारामधे सर्वाधिक फ़सवणूक होते..

    ReplyDelete
  3. आयला भारी, इतक्या सहजी येडं बनवता येतं ... सहीये ब्वा!

    ReplyDelete
  4. ब्लॉग वर्षपुर्ती निमित्त शुभेच्छा!

    ReplyDelete
  5. एकदम भारी. आपल्याकडे अशी कित्येक खेळणी विकल्या जात आहेत.

    ReplyDelete
  6. :( लोकांना येडं बनवायचे सुपर धंदे...

    ब्लॉग वर्षपूर्ती निमित्ते अभिनंदन व पुलेशु! लिहीत राहा. :)

    ReplyDelete
  7. tyancha ek mela tar te afgan pak var halla kartil, bakiche lakh mele tari tyana soyar sutuk nahi ...

    ReplyDelete
  8. संकेतानंद,
    खरं आहे...मायलो गहू, काँग्रेसगवत आणि महत्वाचं म्हणजे चेर्नोबिलचं लोणी....
    आणि >>तिसर्‍या जगातल्या देशांची संरक्षणविषयक व्यवहारामधे सर्वाधिक फ़सवणूक होते..
    कारण तिथले संरक्षणव्यवहार पैसे खिलवून सहज होतात!

    ReplyDelete
  9. अरे आनंदा,
    थोडं डोकं लावलं अन थोडे योग्य ठिकाणी हात ओले केले की सगळं सहज शक्य आहे! :)

    ReplyDelete
  10. देविदासजी,
    खरंच आहे...आपल्या संरक्षणव्यवहारांचा अभ्यास केला तर अशा बर्‍याच 'गंमती' दिसून येतात! :)

    ReplyDelete
  11. श्रीताई,
    अगं काहीही चालतं हल्ली!!! :(
    असाच लोभ ठेव गं.. लिहिता राहिन मी पण! :)

    ReplyDelete
  12. विजय,
    सत्य आहे! अगदी खरं!!
    प्रतिक्रियेबद्दल आभार! भेट देत राहा! :)

    ReplyDelete
  13. श्या !! कसला फालतूपणा आहे.. !!

    काही लोक निष्पाप जिवांशी खेळतात तर काही लोक मृतांच्या 'शवपेट्यांचा' बाजार मांडतात.. सगळे एकमेकांचे भाईबंद !! :(

    ReplyDelete
  14. हेरंब,
    हे पाहिल्यावर माझी पण पहिली रिऍक्शन हीच होती...पण मग चक्क गंमत वाटली...
    किती संवेदनहीन होऊ शकतो आपण! :(

    ReplyDelete