लहान असताना मला कुणी विचारलं की तुझा छंद काय? की मी बेधडक कुठलाही विचार न करता सांगायचो, "वाचन!" अगदी लहान असताना पुढचा प्रश्न येत नसे. मी लॉजिकली विचार केला होता. मला वाचायला कंटाळा येत नाही, उलट मजा येते, ह्याचा अर्थ वाचन हा छंद असायला हवा. पण वाचनाचं वेड वगैरे कधी नव्हतं, ही प्रांजळ कबुली दिलीच पाहिजे. अन छंद नसला तरी आवड निश्चितच होती. कारण माझा कुठलाही सो कॉल्ड छंद उदा. स्टँप गोळा करणे, नाणी गोळा करणे, हा एका विशिष्ट टाईम पिरियडच्या पुढे टिकलाच नाही. वर्ष, दोन वर्षं बस. कारण पुढे काय? हा प्रश्न मला अनादि अनंत काळापासून पडत आलेला आहे. म्हणजे आता बघा. मी स्टँप गोळा करतो. बरं मग मी दोनशे स्टँप जमवले. अन एके दिवशी कळतं की कुणा मित्राकडे पाचशे आहेत. मग मी थोडा हिरमुसतो आणि विचार करतो की मी जर पाचशेपर्यंत जरी पोचलो, तरी पुढे अजून कुणीतरी असणारच आणि स्टँप गोळा करून मुळात आपल्याला आनंद मिळतो का? की आपण फक्त स्पर्धा म्हणून हा प्रकार करतो? अर्थात एव्हढे सखोल विचार मी तेव्हा केले होते की नाही माहित नाही, पण थोडक्यात असं की आपण अशी स्पर्धा खेळतोय ज्याला अंत नाही अन (बहुतेक त्यामुळेच) त्यात मजा नाही अशा निष्कर्षाप्रत मी पोचलो अन ते स्टँप किंवा नाण्यांचं कलेक्शन वगैरे प्रकार मी बंद केले.
छंद म्हणजे काय? हा मूलभूत प्रश्न मला तेव्हा पडला. ओके, ऍक्च्युअली इतका मूलभूत नव्हता, 'माझा छंद नक्की कोणता?' इतपत मूलभूत तरी होता. मी बराच विचार केला. नाणी जमवून पाहिली, स्टँप जमवून पाहिले, डब्ल्यू डब्ल्यू एफ च्या पैलवानांची कार्डं जमवून अन त्याचा खेळ खेळून झाला, क्रिकेटरांची मिळणारी कार्डं जमवून झाली. पण कशालाच मला छंद म्हणता येईना. कारण त्या सगळ्यांचाच मला एका काळानंतर कंटाळा आला होता. मग असं काय होतं ज्याचा मला कधीच कंटाळा आला नाही. वाचन? खरंतर वाचन हा खूप ढोबळ शब्द आहे. जेव्हा कुणी वाचनाचा छंद आहे म्हणतं तेव्हा ते फार ढोबळ वक्तव्य होतं. कारण वर्तमानपत्र, हँडबिलं, पॅम्प्लेट्स, पुराणं, पौराणिक कथा, साहित्य.. पुन्हा साहित्यामध्ये प्रचंड विविध प्रकार. नक्की काय वाचायला आवडतं?
थोडा मोठा झाल्यावर माझ्या छंद कोणता? ला दिलेल्या 'वाचन' ह्या उत्तरावर सहसा "नक्की काय वाचायला आवडतं?" हा पुढचा प्रश्न असायचा. मग मी निरूत्तर व्हायचो. मग थोड्या शांततेनंतर, "असंच काहीही, चांगली पुस्तकं, तशी वर्तमानपत्रंही, पौराणिक कथासुद्धा.." झाला गेम? तसं सगळंच आहे, पण सगळ्यातलं सगळं नाही. पण माझा एक मित्र आहे, तो खरा क्वालिफाय करतो 'वाचन' छंद म्हणून सांगायला. कारण तो काहीही वाचतो. अगदी तल्लीन होऊन. अक्षरशः काहीही. पण मी नाही वाचू शकत काहीही. म्हणजे जेव्हा एखादं पुस्तक झपाटून टाकतं, तेव्हा मी वेड्यासारखा तहानभूक-झोप विसरून पुस्तक वाचत बसतो, नाही असं नाही. अगदी पु.ल. देशपांड्यांची असू देत, किंवा 'नाझी भस्मासुराचा उदयास्त' असू दे किंवा जेम्स हॅडली चेज च्या 'द वेअरी ट्रान्सग्रेसर'च्या शेवटाकडे अंगावर सरसरून काटा येऊन डोळ्यांत पाणी उभं राहू दे किंवा ग्रिशम च्या 'द रेनमेकर' मधल्या नायकाच्या शेवटाकडच्या निवडीवर चेहर्यावर स्मित उमटू दे ते अगदी प्रेमचंद ची 'कर्मभूमी' मिलानमध्ये वाचताना दोन तीन दिवस धड जेवणालाही बुट्टी मारण्यापर्यंत मी वाचनाच्या आहारी जातो. पण वाचनाशिवाय राहू शकत नाही असं म्हणणं अति होईल. काही काही लोकांना खरंच वाचनाशिवाय राहता येत नाही, अन मला अशा लोकांचा हेवा वाटतो. पण मला जमतं बुवा! म्हणजे 'वाचन'ही बाद. पण छंद म्हणून सांगायचं काय, म्हणून मी 'Anything except career books' अशी एक पळवाट काढली. कारण मी बाकी काहीही सहन करू शकतो, पण करियर टाईपची बुक्स मला झेपत नाहीत. 'तुम्हीच तुमच्या यशाचे शिल्पकार' टाईप संदेश असला की मी सहसा दूर असतो.
लहानपणापासून दुसरी एक हौस आहे. लेखनाची! 'कविता' वगैरे, ह्याबद्दल पूर्वीही लिहिलेलं थोडं. अन ते करताना मजाही यायची. अगदी घुसून जायला व्हायचं. अजूनही होतं. पण लिखाणाचं मोटिव्हेशन काय? प्रोत्साहन कुठून मिळतं? तर लिहिलेलं चार लोकांनी वाचलं तर. प्रचंड दुःखी असताना किंवा घुसमट होत असताना लिहिलेलं काही फार वैयक्तिक स्वरूपाचं लिखाण (स्ट्रेस मॅनेजमेंट) सोडता बाकी मी जे काही लिहितो, ते कुणीतरी वाचेल ह्या अंदाजानंच. त्यामुळे ते लोकांसमोर यावं ही सुप्त इच्छा कायमच प्रत्येक क्षणी डोक्यात असते. माझ्यासाठी लिखाण जितकं आवश्यक आहे तितकंच आवश्यक आहे कुणीतरी ते वाचणं. अभिप्राय देणं न देणं हे सर्वस्वी वाचकावर. पण ते लोकांपर्यंत पोचणं मला फार महत्वाचं वाटतं. का ते मला माहित नाही, पण हे अगदी लहानपणापासून आहे. मी लिहिलेल्या कविता किंवा कथा फारशा कधी लोक काय म्हणतील म्हणून दडवून ठेवल्यात असं झालं नाही. आई-बाबांना वाचून दाखवायचो. शाळेच्या मासिकाला द्यायच्या. मग कॉलेजच्या असं करत करत आता ब्लॉगपर्यंतचा प्रवास. जेव्हा मनुष्य कुठलीही गोष्ट ब्लॉगवर पब्लिकली पब्लिश करतो तेव्हा ती पर्सनल कधीच असू शकत नाही. कुणीतरी वाचावं म्हणूनच असते. ह्याचा अर्थ मीही हा ब्लॉग रेकग्निशनसाठीच लिहितो. उगाच ताकाला जाऊन भांडं कशाला लपवा. मी स्वतःसाठी लिहितो हे जरी सत्य असलं, तरी ते पूर्णसत्य नाही. पण लेखनामध्ये मात्र मी वाचनासारखा नाही, मी लिहायला काहीही लिहू शकतो. अर्थात ते चांगलं असेलच असं नाही. पण त्याचा कंटाळा नाही. कितीही अन काहीही!
माझी तिसरी अन लेटेस्ट म्हणजे गेल्या पाचेक वर्षांतली आवड म्हणजे सिनेमे. अन ही आवड ऑलमोस्ट वेडाच्या उंबरठ्यावर आहे. सिनेमे लहानपणापासून पाहिले, पण एका अंतरावरून. पण 'ओल्डबॉय' ने प्रत्यक्ष सिनेमाशी गळाभेट घडवली. सिनेमा अंगावर येतो किंवा विचारप्रवृत्त करतो किंवा अंतःकरण हेलावून सोडतो म्हणजे काय, हे 'ओल्डबॉय' ने दाखवलेल्या वाटेवर चालल्यानंतर कळू लागलं. मग पेपरात समीक्षकांनी किंवा सिनेजाणकारांनी लिहिलेल्या गोष्टींचे अर्थ उमजू लागले, समजत आधीही होते. आणि सिनेमाचं वेड इतकं भारी पडू लागलं, की पूर्वी मोकळ्या वेळात हातात येत असलेलं पुस्तक तसंच न वाचता पडून राहू लागलं. सुरूवात झाली वाचायला तरच झपाटायला होणार, पण इथे पुस्तकाला सुरूवातही होत नाही आताशा!
तर थोडक्यात अजूनही माझा छंद नक्की कोणता? हा प्रश्न बर्यापैकी अनुत्तरित आहे. पण बहुतेक निवडक वाचन, लेखन अन सिनेमा असे तीन छंद आहेत असं ढोबळमानाने म्हणता येईल. हुश्श! चला एक प्रश्न निकाली निघाला. आता आपण अजून मूलभूत प्रश्नाकडे वळू. छंद म्हणजे नक्की काय?
मला ठाऊक आहे. प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा क्रम चुकलाय. पण आधी लौकिकदृष्ट्या महत्वाचा प्रश्न सोडवणं महत्वाचं होतं. आत्मिक अन आध्यात्मिक प्रश्न नेहमी शेवटी सोडवावेत. तस्मात आता मूलभूत प्रश्न.
छंदाची एक जबरदस्त व्याख्या आहे. जे करताना माणसाला आनंद मिळतो, तो त्याचा छंद! अन ही एकदम बँग-ऑन वगैरे म्हणतात ना तशा टाईपची व्याख्या आहे. पण लोक इथे एक पायरी ओलांडून पुढे जातात अन म्हणतात जेव्हा माणसाचा छंद आणि उत्पन्नाचं साधन एक असतं, तेव्हा तो माणूस सर्वांत सुखी असतो. पण इथे एक गोम आहे. जेव्हा छंद उत्पन्नाचं साधन बनतो, तेव्हा त्यामध्ये व्यावसायिकता येण्याची दाट शक्यता निर्माण होते. माणसाला ती सीमारेषा न ओलांडण्याची तारेवरची कसरत करावी लागते. तरच तो खर्या अर्थाने अर्थार्जन अन छंदजोपासणी दोन्ही करू शकतो. पण बरेचदा परिस्थितीमुळे म्हणा किंवा वाईट संगतीमुळे ही सीमारेषा पार होते आणि छंदाचं रूपांतर व्यवसायात होतं. आणि एकदा तो व्यवसाय झाला की त्यातनं आनंद मिळणं बंद होतं.
हल्लीच्या मुलांकडून पालक ज्या मणामणांच्या अपेक्षा ठेवून छंद 'जोपासायला' लावताना दिसतात ते पाहून कधी कधी बरं वाटतं की आपल्याला लहानपणी 'वाचन' हा एकदम हार्मलेस छंद होता! अन कुठल्याच छंदाचा तेव्हा व्यवसाय झालेला नव्हता.
विचार पटले मित्रा...
ReplyDeleteलेख आवडला.
पर्फेक्ट..छंद असलेल्या गोष्टींचा व्यवसाय करू नये.
ReplyDeleteमस्त लिहलयस भाई...एकदम बँग-ऑन :)
समद्ये विचार एवस्तित मांडल्येल्ये हायेत... लहानपणी घरी बाबांचे मित्र आले की ’तुझा छंद कोणता??’ हा प्रश्न विचारायचे, नाहितर शाळेत माझा छंद नामक निबंध लिहावा लागायचा, तेव्हाही असाच मी दरवर्षी नवा छंद लिहायचे... :त्यातल्या त्यात चित्र काढणे , वाचणे जरा टिकून आहेत...
ReplyDeleteपण तुझ्याचसारखे कुठल्याही छंदाने जिवाला पिसे लावलेले नाही :)
छंदाची व्याख्या आवडली...शेवटचा पॅरा अप्रतिम :)
विद्याधर! सूऽऽपर्ब! मस्तच! मला खूप आवडलं तुमचं हे चिंतन.अगदी स्पष्टं आहात तुम्ही त्याबद्दल आणि माझ्या मते योग्य ट्रॅक आहे तुमचा.मला वाटतं असा एखादाच ’माझा छंद’ वगैरे जरा अतिच असतं.दुसरं म्हणजे बहुतेक जण चित्रपट या जबरदस्त माध्यमाकडे खेचले जातातच.खूप ताकदीचं माध्यम आहे ते.उद्या आणखी काही ’छंद’ करावासा वाटला अशा ताकदीचा तर जरूर करावा, हे माझं मत.
ReplyDeletemast lihiles re !!
ReplyDeleteasach lihit raha... :) :)
बापरे, अजुन एक छंद आहे ना तुला...
ReplyDeleteविचार करण्याचा...
बघ पटतंय का...
"... आणि सिनेमाचं वेड इतकं भारी पडू लागलं, की पूर्वी मोकळ्या वेळात हातात येत असलेलं पुस्तक तसंच न वाचता पडून राहू लागलं."
ReplyDeleteएकदम बरोबर - TV अणि computer आल्यापासून वाचनाची बोम्ब उडालीये.
छंद टिकत नाहित म्हणून ते छंद असतात. नाहीतर व्यसन झालं असतं.
ReplyDeleteराज,
ReplyDeleteधन्यवाद मित्रा!
सुहास,
ReplyDeleteबरेचदा वाटतं मलाही जे आवडतं ते आयुष्यात उत्पन्नाचं साधन व्हावं..पण एक धूसर सीमारेषा आयुष्यभर पाळावी लागेल त्यासाठी..आजूबाजूला ते भान सुटलेली अनेक उदाहरणं आहेत! :)
तन्वीताई,
ReplyDeleteतो एकदम स्टँडर्ड प्रश्न..अन तो निबंधही... त्या निबंधासाठी वेगवेगळ्या छंदांबद्दल कल्पनाविस्तार करणं हा माझा अजून एक छंद ;)
विनायकजी,
ReplyDeleteधन्यवाद! मला खरंच नेहमी छंद ह्या प्रकाराबद्दल कुतूहल वाटतं. समाधानकारक उत्तरं मिळत नाहीत तेव्हा फक्त आनंद शोधायचा..कारण जगात प्रत्येक गोष्टीला अनेक पैलू असतातच..
आणि सिनेमाबद्दल तर काय बोलणार..माझे अर्धे ब्लॉगपोस्ट्स त्याशीच निगडीत असतील.. :)
माऊताई,
ReplyDeleteतुम्ही सगळे पाठीशी आहातच नेहमी.. त्यामुळे बिनधास्त लिहितोय :)
आनंदा,
ReplyDeleteआयला, हा विचारच केला नव्हता मी! ;)
आदित्य,
ReplyDeleteखरं आहे...पण तरी वाचन टिकेलच असं वाटतं... कारण तो पुस्तकाचा फील वेगळाच! :)
सौरभ,
ReplyDelete>>छंद टिकत नाहित म्हणून ते छंद असतात. नाहीतर व्यसन झालं असतं.
स्वामी बाबाकांत की जय हो! :D:D
बाबाकांतच्या point मध्ये मुद्दा आहे खरा !! :) वाचनाचा छंद कधीकधी व्यसन बनतो. मग आपण पुस्तकच नव्हे तर मिळेल ते वाचत सुटतो.. जालावर तर तुम्ही २४ तास वाचू शकता एवढी रुचकर माहिती आहे. त्यामुळे "काय वाचता ?" या प्रश्नाचे उत्तर "जे मिळेल ते" असे देणारा छांदिष्ट म्हणता येईल.साधारणतः छांदिष्ट व्यक्ती त्यांच्या छान्दमागे वेडे असतात. वाचन बरेच जण करतात पण वेड्यागत वाचन करणे छंद झाला.एखादे नाणे गोळा करायला वाट्टेल ती किंमत मोजायला तयार असणारा छांदिष्ट झाला. आणि हो, यातून त्याला प्रचंड आनंद लाभत असतो.
ReplyDeleteजळी स्थळी माझ्या हातात पुस्तक दिसे. ते पाहून पाहून वैतागलेली आजी एकदा म्हणाली, " कार्टीला अक्षरे खायचे व्यसन लागलेय. ना खाण्याची शुध्द ना पिण्याची. नुसता कागदांचा फडशा पाडने चालूच. " या छंदाचा खूप फायदा झाला आणि टिकूनही राहिला :) कल्पनाविलासही त्यातूनच घडत गेले.
ReplyDeleteतुझा परामर्ष आवडला. " छंदाचा व्यवसाय झाला की छंद संपतो आणि हिशेब सुरू होतो. "
व्यासानावरून आठवलं - वपुंची एक कथा आहे, अविनाश. त्याला लिहायचा छंद/व्यसन असतं. तसं काही झालं नाही म्हणजे मिळवलं :)
ReplyDeleteश्रीताई,
ReplyDeleteथोडक्यात 'वाचन' हा छंद सांगायला तू एलिजिबल आहेस! :D
खरंच वाचन फार शिकवून जातं...परवाच मधुर भांडारकर इंटरव्ह्यूत म्हणाला..तो फक्त ६वी पास(किंवा नापास) आहे... बस.. जे काही शिकला आयुष्यात..ते वाचनातून.. :)
आदित्य,
ReplyDeleteमला पण तीच भीती वाटतेय रे! :D
संकेत,
ReplyDeleteअगदी बरोबर... 'आनंद' लाभणं हेच महत्वाचं..मग त्याला काहीही नाव द्या..टेक्निकली काहीच फरक पडत नाही!
परफेक्ट.. सही एकदम.. वाचता वाचता मलाही जाणवलं की छंद म्हटलं की माझंही गाडं वाचन-लेखन आणि गेल्या काही वर्षात चित्रपट पाहणे यावर येऊन थांबतं हे जाणवलं :)
ReplyDeleteहेरंबा,
ReplyDeleteआपण बहुतेक माहितीतंत्रज्ञानाच्या वावटळीत सापडलेल्या पिढीचं प्रतिनिधित्व करतो! :)